गांधीजींचा गौरव थांबून त्यांची उणी दुणी काढणे सुरु झाले आहे. देशाचे नवे सत्ताधारी व त्यांचे प्रचारक व हस्तक, गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लोकलढा आणि त्यात केलेले बलिदान पुसून टाकायला निघाले आहेत. गांधी हा राष्ट्रपिता जणू आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आले- गांधी आणि त्यांचे टीकाकार. 15 ऑगस्ट 2017 ते 24 फेब्रुवारी 2018 या काळात साधना साप्ताहिकातून ते क्रमशः प्रसिद्ध झाले. एका वर्षात या पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या.
महात्मा गांधींवरील टीकाकारांची टीका, त्या टिकेमागील त्यांची भूमिका, त्या टिकेतले खरेखोटेपण सांगणे आणि त्या टीकाकारांना कमी न लेखता ते सांगणे या उद्देशाने लिहिलेले हे पुस्तक आहे.
गांधी आणि त्यांचे टीकाकार (लेखसंग्रह) – हिंदुत्ववादी, समाजवादी – साम्यवादी, मुस्लीम लीग, क्रांतिकारक, डॉ. आंबेडकर इत्यादी विरोधक आणि सुभाषबाबू, नेहरू, पटेल, आझाद, कस्तुरबा इत्यादी सहकारी यांच्याशी महात्मा गांधींचे संबंध कसे होते, याविषयीचे लेख.