या सामाजिक गोष्टी असल्या तरी या कहाण्यांची खरी ताकद आहे ती म्हणजे त्या घडवीत असणारे स्त्रीरूप-दर्शन. स्त्रीचे खरे रूप काय आहे ह्याचे सुस्पष्ट दर्शन आपल्याला या गोष्टींमधून होते. ते आदिम आहे. सद्यःकालीन आहे आणि भविष्यातलेही आहे. मुख्य म्हणजे ते वाचकाला स्तिमित करून टाकणारे आहे. कुटुंबाचा भार वाहणारी, दिवसरात्र कष्ट उपसणारी, गरिबीतही हिंमत न हारलेली, रुढींच्या बंधनांनी पिचलेली आणि जागृत झाल्यावर तीच बंधने भिरकवणारी, उद्यमशील, स्वावलंबी, स्वतःचे जगणे जगता जगताच व्यापक करुणेने ओथंबलेली आणि वेगळ्या जिद्दीने भविष्यकाळ घडवू इच्छिणारी स्त्री या कहाण्यांमधून उभी राहते. आणि हे दर्शन स्वप्निल, आदर्शात्मक किंवा भासमान नाही; ते खरे आहे. ही अशी स्त्री आपल्याभोवती खरोखरच राहते आहे. तिने आपल्या कष्टाने आणि कर्तृत्वाने हा समाज तोलून धरलेला आहे. त्या स्त्रीचे दर्शन हे या पुस्तकाचे खरे श्रेय आहे.
मिलिंद बोकील
Reviews
There are no reviews yet.