सुंदर पत्रे । Sundar Patre
₹200.00सुधा, तुला अण्णांनी लिहिली तशी पत्रे मराठीत पूर्वी कोणी लिहिली नव्हती आणि पुढेही कोणी लिहील असे वाटत नाही. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशांची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरून दिसते, त्याप्रमाणे तुला लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून गुरुजींचे – तुझ्या अण्णांचे मन स्पष्ट दिसून येत असे. त्यांच्या मनाचे सारे भाव त्या पत्रांतून उमटलेले आहेत.
सुधाताई, तू मोठी भाग्याची. तुझ्या अण्णांचा थोरल्या भावावर जसा जीव होता तसाच तुझ्यावरही. देवाघरी जातानासुद्धा त्याचा फोटो त्यांनी आपल्या उजव्या खिशात ठेवला होता! गुरुजी नाना ठिकाणी हिंडत. नाना देश, नाना वेष, सृष्टीचे नाना प्रकार ते पाहत. त्यांची दृष्टी जरी भूमीकडे सदैव वळलेली दिसे, तरी त्यांच्या नजरेतून बारीकसारीक गोष्टदेखील निसटत नसे. त्यांची नजर जशी रत्नपारख्याची होती! ती चांगले तेवढे टिपून घेई आणि ज्यात आयब असेल, दोष असेल ते सोडून देई.
साऱ्या देशभर हिंडून आणि शेकडो ग्रंथ चाळून साक्षेपाने गोळा केलेल्या सुमधुर, सुरस, सुगंधी नि टपोर स्मृतींचे द्रोणच्या द्रोण भरून ते तुला दर शनिवारी पाठवीत. मग तू भाग्याची नाहीस का? आणि तुला पाठवलेल्या या भेटीचा स्वाद उभ्या महाराष्ट्रातल्या शेकडो, हजारो मुलांना गेले वर्षभर चाखायला मिळाला, हे त्यांचे भाग्य ! तुला लिहिलेली पत्रे महाराष्ट्रातील सर्व बाळगोपाळांचा वारसा होणार आहे, हे तुझ्या अण्णांना ठाऊक होते. त्यांच्यापाशी आप- परभावच नव्हता. श्यामची आई साऱ्या महाराष्ट्राची आई झाली, तशी अण्णांची तू सुधाताई साऱ्या महाराष्ट्राची सुधाताई झाली आहेस..
– ना. ग. गोरे