चले जाव – 1942 च्या ठरावावरील भाषणे | Chale Jao – 1942 Chya Tharawawaril Bhashne
₹70.00चले जाव (भाषणसंग्रह) – 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे ‘चले जाव’ ठराव मंजूर झाला, त्या सभेत गांधींनी केलेली तीन भाषणे आणि नेहरू, पटेल, आझाद या तिघांचे एक भाषण संकलित करण्यात आले आहे. ही ऐतिहासिक भाषणे पहिल्यांदाच पुस्तकरूपाने एकत्रितपणे प्रसिद्ध झाली आहेत.
चिखलाचे पाय | Chikhalache Pay
₹100.00डॉ. दिलीप शिंदे यांनी या पुस्तकात त्यांना वृद्धाश्रमात भेटलेल्या तेरा व्यक्तींची अनुभवचित्रे शब्दबद्ध केली आहेत. डॉ. शिंदे यांची लेखनशैली प्रवाही, प्रासादिक आहे. त्याचबरोबर त्यांच्या वृत्तीतील संवेदनशीलता अधिक भावणारी आहे. त्यांच्या स्वतःच्या प्रवृत्तीत ‘वृद्धाश्रम पासून ते ‘वृद्धाश्रमांची अपरिहार्यता’पर्यंत झालेली स्थित्यंतरे त्यांनी प्रामाणिक थेटपणाने नोंदवली आहेत. प्रत्येक अनुभवचित्र हे एक कथेचा घाट घेऊन येते. त्यामुळे ती वाचनीय आहेत. या पुस्तकाचा इत्यर्थ डॉ. शिंदे यांनी समारोपात अब्राहम हेशेल यांच्या एका वाक्यातून सांगितला आहे. जग बदलते आहे. विज्ञाननिष्ठ, व्यवहारनिष्ठ होत आहे. हे सगळे खरे असले तरी एक महत्त्वाची जाणीव अब्राहम यांच्या शब्दात – “जगाला आपली प्रगती साधण्यासाठी ज्ञान-विज्ञानाप्रमाणेच प्रेमाची व मानवतेचीही गरज आहे.” हे भानच या लेखनामागची आणि आत्मीय कार्यामागची खरी प्रेरणा आहे.
– प्रा. डॉ. तारा भवाळकर
चिनी महासत्तेचा उदय | Chinee Mahasattecha Uday
₹440.001949 मध्ये माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये क्रांती झाली. आणि 1978 मध्ये डेंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने नवे वळण घेऊन महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. त्यानंतरच्या चाळीस वर्षात चीनने अर्थव्यवस्था अधिकाधिक खुली करीत जोमाने आर्थिक विकास साधला. कोट्यवधी गरीब लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढून मानाने जगायला शिकविले.जलद आर्थिक विकासामुळे चीनने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत मनाचे स्थान प्राप्त केले खरे !
जनता पक्षाचा प्रयोग – खंड 1 ते 4 | Janata Pakshacha Prayog – Khand 1 te 4
₹1,200.001 मे 1922 ते 8 जानेवारी 1995 असे 72 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या मधु लिमये यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच संपले आहे. भारतातील समाजवादी चळवळीतील पहिल्या पिढीचे प्रमुख नेते व विचारवंत अशी त्यांची ओळख राहिली आहे. त्यांची मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये मिळून लहान-मोठी अशी तीन डझन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी 1994 मध्ये ‘Janata Party Experiment’ या शीर्षकाखाली इंग्रजीत 1200 पानांचा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला होता. तो बृहद् ग्रंथ मराठीत प्रथमच प्रकाशित होत आहे. वाचकांच्या सोयीसाठी मराठी अनुवाद चार खंडांत येत आहे. खंड 1 व 2 चे अनुवाद वासंती फडके यांनी, तर खंड 3 व 4 चे अनुवाद सुनिती जैन यांनी केले आहेत. मराठीतील प्रत्येक खंड तीनशे ते साडेतीनशे पाने यादरम्यान असून, प्रत्येक खंडाची किंमत 350 रुपये आहे. या अनुवादित ग्रंथाचे संपादन अमरेंद्र धनेश्वर व अनिरुद्ध लिमये यांनी केले आहे. 1975 ते 1980 या काळातील अत्यंत स्फोटक असे भारताचे अंतर्गत राजकारण आणि अखेर सत्तांतर यांचे अधिक चांगले आकलन करून घेण्यासाठी हे चार खंड वाचायला हवेत, संग्रही ठेवायला हवेत!
जनांचा प्रवाहो चालिला | Janancha Pravaho Chalila
₹240.00जॉर्ज ऑर्वेलच्या ‘होमेज टू कॅटॅलोनिया’ या पुस्तकाने माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. स्पॅनिश यादवी युद्धात ऑर्वेल सैनिक म्हणून गेला खरा, पण बार्सेलोनाच्या डोंगराळ भागात युद्धाचा फारसा जोरच नव्हता. गोळीबार करण्याचे प्रसंगसुद्धा हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच त्याच्या वाट्याला आले. तरीही स्वतःचे अनुभव सांगायचे, त्यांचं विश्लेषण करायचं, निरीक्षणे व निष्कर्ष नोंदवून ठेवायचे असे ठरवून एक अतिशय वाचनीय पुस्तक त्यानं लिहिलं. यादवी युद्धामुळे दुभंगलेला स्पेनचा समाज त्याच्या शब्दांमधून साकार झाला, मूर्त झाला.
मी तेच तंत्र अनुसरायचं ठरवलं. सगळं खरं सांगायचं, मोकळेपणाने सांगायचं आणि त्याचा विचार करायचा व मतं मांडायची एवढीच शैली मी वापरली. कोणताही विशिष्ट फॉर्म डोळ्यांपुढे ठेवला नाही. त्यामुळे एका मनमोकळ्या आत्मशोधाचं स्वरूपही आपोआप व सावकाश, पण निश्चितपणे येत गेलं. परिणामी, व्यक्तिस्वातंत्र्य, आविष्कार स्वातंत्र्य, लोकशाही, प्रामाणिकपणा व सहानुभूती या मूल्यांचा मी निष्ठा म्हणून स्वीकार कसा करीत गेलो, हेही तपासून पाहण्याची गरज मला जाणवू लागली.
जन्म बिगर-कॉंग्रेसवादाचा : खंड 1 आणि खंड 2 | Janma Bigar-Congressvadacha : Khand 1 Ani Khand 2
₹500.00खंड 1
भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या पहिल्या अठ्ठावीस वर्षांच्या (1947 ते 1975) अत्यंत महत्त्वाच्या अशा कालखंडाचा समग्र राजकीय इतिहास सदर ग्रंथात दस्तऐवजांसह ग्रथित झाला आहे. या काळात राजकारणावर जवाहरलाल नेहरूप्रणीत आणि नंतर इंदिराप्रणीत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व पक्ष, विशेषतः सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट पक्ष, जोमाने उतरले होते, परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली. पुढल्या दशकात सत्ताधारी काँग्रेसबाबत कोणती भूमिका घ्यावी? मर्यादित सहकार्याची की कट्टर विरोधाची? या दुविधेत सोशालिस्ट आणि कम्युनिस्ट पक्ष अडकले. त्या काळात धर्माधिष्ठीत राजकारण करणाऱ्या पक्षांना नाममात्र जनाधार होता.
प्रमुख आणि प्रज्ञावंत राजकीय नेते या नात्याने मधु लिमये या काळात सक्रिय होते. भाषावार प्रांतरचना आणि प्रादेशिक अस्मिता हे मद्दे ऐरणीवर आणून विरोधी पक्षांनी काँग्रेसला आव्हान दिले. जयप्रकाश नेहरू चर्चा, सोशलिस्ट पक्षातील फाटाफूट, राममनोहर लोहियांच्या नव्या पक्षाची स्थापना, प्रसोपा आणि संसोपा यांच्यातील दुरावा, जयप्रकाशांचा राजकीय संन्यास आणि लोहियांबरोबरचे मतभेद इत्यादी बाबींचा सखोल परामर्श लिमये घेतात. चीनच्या आक्रमणानंतर सर्व बिगर काँग्रेस पक्षांची मोट बांधून 1967 ची सार्वत्रिक निवडणूक लढविण्याची व्यूहरचना लोहियांनी केली, त्यातून उत्तर भारतात काँग्रेस पराभूत झाली. पण राज्याराज्यांमधली संयुक्त विधायक दलांची सरकारे राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या तत्त्वशून्य सत्तालालसेपायी गडगडली. या काळाचा हा इत्थंभूत इतिहास.
खंड 2
स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या 30 वर्षांत भारताच्या राजकारणावर 1947 ते 1964 या काळात जवाहरलाल नेहरूंचे आणि नंतरच्या दशकात म्हणजे 1977 पर्यंत इंदिरा गांधींचे वर्चस्व होते. समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्ष हे प्रमुख विरोधी पक्ष असले तरी त्यांचा प्रभाव मर्यादित होता. धर्माधिष्ठीत राजकारण करणाऱ्या जनसंघ, मुस्लीम लीग, अकाली दल यांची शक्तीही नाममात्र होती. 1962 मध्ये चीनने आक्रमण केल्यानंतर भारताला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. त्यातून निर्माण झालेल्या असंतोषाला वळण देण्यासाठी आणि काँग्रेसची सत्तेवरची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सर्व बिगर काँग्रेसवादी पक्षांची संयुक्त आघाडी करण्याची कल्पना राममनोहर लोहियांना सुचली. त्याचे फलित काय आणि त्या प्रक्रियेत काय गुंतागुंत होती, हे त्या कालखंडातले प्रमुख राजकीय नेते मधु लिमये यांनी या पुस्तकात लिहिले आहे. पहिला खंड वाचकांच्या हाती अगोदरच पडला आहे.
सदर खंडात इंदिरा गांधींनी काँग्रेस पक्षात घडवून आणलेली पहिली फूट, स्वतंत्र पक्ष / जनसंघ / कम्युनिस्ट पक्ष यांची देशाच्या राजकारणातली भूमिका आणि स्थान, सत्तेच्या केंद्रीकरणासाठी इंदिरा गांधींनी वापरलेले नीतिभ्रष्ट मार्ग, बिहार आणि गुजरात आंदोलन आणि जयप्रकाशांचे दिग्विजयी पुनरागमन, विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी त्यांनी चालवलेले प्रयत्न इत्यादी बाबींचे तपशीलवार विश्लेषण आहे.
लोहियांनी मांडलेल्या कल्पनेचे राजकारणाच्या धकाधकीत तीनतेरा वाजले असले, तरी तेच सूत्र घेऊन जयप्रकाशांनी इंदिरा गांधींना कसे आव्हान दिले, याचा आढावा लिमये घेतात आणि 1975 च्या आणीबाणीपाशी हे इतिहास कथन आणून थांबवतात.