Muslim Manaacha Kanosa | मुस्लिम मनाचा कानोसा
₹240.00मुसलमानांना आवडणारी अगर न आवडणारी, पण मुस्लिम समाजात चालू असणारी जी सामाजिक आंदोलने आहेत, त्या आंदोलनांकडे व मुस्लिमांच्या मनात घोळत असणाऱ्या प्रश्नांकडे मराठी वाचकांचे लक्ष वेधावे, एवढाच या टिपणांचा हेतू आहे. मुस्लिम समाजाचे मनोगत मराठी वाचकांसमोर आणण्याचे प्रयत्न फारसे होतच नाहीत. मुल्कपरस्तांनी या दृष्टीने जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नात सातत्य होते आणि वैविध्यही होते. असा एकटा हाच एक प्रयत्न होता म्हणून या उपक्रमाला महत्त्व आहे.
गांधीजी आणि त्यांचे टीकाकार | Gandhiji Ani Tyanche Tikakar
₹240.00गांधीजींचा गौरव थांबून त्यांची उणी दुणी काढणे सुरु झाले आहे. देशाचे नवे सत्ताधारी व त्यांचे प्रचारक व हस्तक, गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लोकलढा आणि त्यात केलेले बलिदान पुसून टाकायला निघाले आहेत. गांधी हा राष्ट्रपिता जणू आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आले- गांधी आणि त्यांचे टीकाकार. 15 ऑगस्ट 2017 ते 24 फेब्रुवारी 2018 या काळात साधना साप्ताहिकातून ते क्रमशः प्रसिद्ध झाले. एका वर्षात या पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या.
महात्मा गांधींवरील टीकाकारांची टीका, त्या टिकेमागील त्यांची भूमिका, त्या टिकेतले खरेखोटेपण सांगणे आणि त्या टीकाकारांना कमी न लेखता ते सांगणे या उद्देशाने लिहिलेले हे पुस्तक आहे.
गांधी आणि त्यांचे टीकाकार (लेखसंग्रह) – हिंदुत्ववादी, समाजवादी – साम्यवादी, मुस्लीम लीग, क्रांतिकारक, डॉ. आंबेडकर इत्यादी विरोधक आणि सुभाषबाबू, नेहरू, पटेल, आझाद, कस्तुरबा इत्यादी सहकारी यांच्याशी महात्मा गांधींचे संबंध कसे होते, याविषयीचे लेख.
स्त्रीपुरुषतुलना | STREEPURUSHTULNA
₹200.00भारताच्या इतिहासात एकोणिसावे शतक महत्त्वाचे मानले जाते. का, तर ते सत्तांतराचे शतक आहे, नव्या जीवनजाणिवांच्या आरंभाचे शतक आहे, वैचारिक कलहाचे शतक आहे, आत्मपरीक्षणाचे शतक आहे, परंपरेचा आंधळेपणाने स्वीकार न करता परंपरेला आव्हान देणारे शतक आहे, मूलभूत प्रश्नांची जाग आणणारे शतक आहे, परंपरेला आक्रमकपणे सामोरे जाऊन नवा विचार मांडणाऱ्यांचे शतक आहे, नव्या शक्तीच्या उपासनेचे शतक आहे, एवंच, प्रबोधनाचे शतक आहे. ‘तत्पूर्वीच्या एक हजार वर्षांत जे घडले नाही’ ते ज्या शतकात घडले असे शतक आहे, मराठी वाङ्गयाच्या दृष्टीने नवनवीन लेखने व लेखनप्रकार ज्या शतकात निर्माण झाले असे शतक आहे. या शतकाने मराठी वाङ्ख्याला जी अनमोल रत्ने दिली त्यांपैकी एक म्हणजे ताराबाई शिंदे (1850-1910) यांचे ‘स्त्रीपुरुषतुलना’ हे पुस्तक. या पुस्तकात स्त्रीपुरुषांमधील सारा असमतोल दूर करून स्त्रीजातीला पुरता न्याय मिळवून द्यावा अशी खटपट आहे. इतके आधुनिक क्रांतिदर्शी विचार इतक्या तर्कशुद्ध पद्धतीने एका स्त्रीने मांडलेले, मराठी गद्याने पहिल्यांदाच अनुभवले. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख (1823-1892) आणि महात्मा जोतीराव फुले (1827-1890) यांच्या लेखणीने ही करामत यापूर्वी केली असली, तरी एका स्त्रीने हे धैर्य दाखविल्याचा हा पहिलाच प्रसंग म्हणावा लागेल.
Namdar Gokhale Charitra | नामदार गोखले चरित्र
₹200.00१८६६ ते १९१५ असे जेमतेम ४९ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांचे सार्वजनिक आयुष्य तीन दशकांचे होते. नेक नामदार अशी त्यांची ओळख देशभर रूढ झाली. पण त्यांची सुरुवातीची ओळख सुधारकाग्रणी गो. ग. आगरकर व न्या. म. गो. रानडे यांचे शिष्य अशी होती. तर अखेरच्या काळातील ओळख मोहनदास करमचंद गांधी यांचे राजकीय गुरू अशी होती.
त्यांचे दहावे स्मृतीवर्ष आले तेव्हा, म्हणजे १९२४ मध्ये त्यांचे चरित्रलेखन स्पर्धा मुंबई विद्यापीठाने जाहीर केली. त्या स्पर्धेत पांडुरंग सदाशिव साने या २४ वर्षांच्या तरुणाने भाग घेतला, तेव्हा तो नुकताच एम.ए. झाला होता. त्या तरुणाने पुस्तक लिहायला सुरुवात तर लगेच केली, पण ते वाढत गेले आणि दरम्यान, स्पर्धेसाठी लेखन सादर करण्याची मुदत संपून गेली.
आणि मग ते हस्तलिखित, त्या तरुणाच्या दत्तो वामन पोतदार या शिक्षकाने एका प्रकाशकाकडे सोपवले. ते पुस्तक फेब्रुवारी १९२५ मध्ये प्रकाशित झाले. नामदार गोखले यांचे विस्तृत म्हणावे असे ते पहिले चरित्र आणि त्या तरुणाचे प्रकाशित झालेले ते पहिले पुस्तक. त्यानंतर पाच वर्षांनी तो तरुण, संपूर्ण महाराष्ट्रात साने गुरुजी या नावाने ओळखला जाऊ लागला.