ही कहाणी आहे गब्रू नावाच्या कोंबड्याची, त्याच्या आरवण्यासंबंधीची. गब्रूच्या आरवण्यामुळे झोपमोड होते अशी तक्रार केली जाते. त्या वेळेस कोंबड्याच्या बाजूने उभी राहतात सृजन कट्ट्यावरची मुलं. ही मुलं गोष्टी ऐकतात, सांगतात आणि लिहितातही!
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मोल त्यांनी ओळखलंय. चिकित्सक, संवादी वृत्ती. आणि संवेदनशीलता यामुळे या मुलांना परीक्षा, अभ्यास, शिकणे आणि एकूणच जगण्याकडे बघण्याची डोळस दृष्टी आहे. कोंबड्याच्या आरवण्याच्या नैसर्गिक अभिव्यक्ती हक्कावर गदा येण्याची वेळ येते तेव्हा, ही धडपडणारी मुलं पुढाकार घेतात. पुढे होतो नाट्यमय प्रवास… त्यातून कुमारवयातील ऊर्जेला योग्य वाट मिळते. आणि मग मुलंही मोठ्यांपुढे आदर्श निर्माण करतात, याचा वस्तुपाठ आपल्यासमोर येतो.
कादंबरी रंजक तर आहेच, पण थेटपणे उपदेश न करता कल्पना आणि विचार करायला लावणारी आहे. परिणामी, ही कलाकृती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सांविधानिक मूल्ये याविषयी जाणीव जागृती करते. कादंबरीत आलेल्या लोककथा, लोकगीते आणि प्राणी, पक्षी, निसर्ग यामुळे एका वेगळ्या विश्वाची सफर घडते. संघर्ष, नाट्य, चमत्कार, अद्भुत प्रसंग यामुळे कुतूहल वाढते. कहाणी उत्कंठावर्धक होते, कथानक झपाटून टाकते…!
