विविध क्षेत्रांमध्ये काम करताना मानवी मनाचे मला जे दर्शन घडले त्याचे सम्यक वर्णन करण्याचे सार्मथ्य माझ्यात नाही. मला सामान्यांचे असामान्यत्व दिसले तेव्हा मी स्तिमित झालो. अनेक बाबतींत मोठ्या असणाऱ्या माणसांच्या मनातील थिटेपणा काही प्रसंगात पाहून मी व्यथित झालो. कलंदर वृत्तीच्या काही जणांच्या सहवासात मला माझ्या सावधपणे जगण्याच्या वृत्तीची लाज वाटली. बुद्धीची विलक्षण झेप असणाऱ्या काही माणसांची आत्मकेंदित आणि आत्मसंतुष्ट वृत्ती पाहून माझे मन उद्विग्न झाले. संगीत, चित्रकला, नृत्य आदी ललितकलांचा रसिकतेने आस्वाद घेताना बेहोष होणारे माझे मित्र पाहून, माझी संवेदनशीलता किती उणी आहे हे मला जाणवले आणि मन उदास झाले. मोहाच्या काही प्रसंगी झालेली माझ्या मनाची तडफड आणि काही प्रसंगांतील दुर्बलता आठवली की आजही माझे मन खिन्न होते. अनेक तऱ्हेचे अनुभव आले आणि तरीही जीवन संपूर्णपणे कळले, असे मला वाटत नाही. – ग. प्र. प्रधान
Reviews
There are no reviews yet.